योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक महिला उभा करू शकते स्वतःचा व्यवसाय - अमृत महाराष्ट्र

योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक महिला उभा करू शकते स्वतःचा व्यवसाय

पनवेलमध्ये अमृत संस्थेच्या ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षणवर्गाच्या उद्घाटनप्रसंगी अमित सामंत यांचे प्रतिपादन

योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक महिला उभा करू शकते स्वतःचा व्यवसाय मुख्य फोटो
योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक महिला उभा करू शकते स्वतःचा व्यवसाय अतिरिक्त फोटो

पनवेल (जि. रायगड) : 'आजच्या काळात कौशल्यवान मनुष्यबळाला मोठी मागणी आहे. आपण घेत असलेले प्रशिक्षण हे केवळ छंद म्हणून नव्हे, तर स्व-आनंद आणि अर्थार्जनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक महिला स्वतःचा व्यवसाय उभा करू शकते,' असे प्रतिपादन अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी केले. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेच्या ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण बॅचचा पनवेलमध्ये नुकताच प्रारंभ झाला. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या रायगड शाखेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणवर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात सामंत बोलत होते.

अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असून, त्याकरिता विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने हा एक महिन्याचा प्रशिक्षणवर्ग पनवेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या बॅचमध्ये १० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून, प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशीपासून उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

या प्रशिक्षणामध्ये ब्युटीकेअर क्षेत्रातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे. स्किन केअर, हेअर केअर, वॅक्सिंग (नॉर्मल व ॲडव्हान्स पद्धती), मिनी केअर सेवा, तसेच ऑइल मसाज यांसारख्या तांत्रिक बाबींवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना थिअरीबरोबरच प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सर्व कौशल्ये आत्मसात करता येण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाचे नियोजन आहे.

प्राथमिक प्रशिक्षणाची सुरुवात सौ. सुवर्णा तोंडुलकर यांच्या क्लिनिकमध्ये करण्यात आली असून, पुढील टप्प्यातील सर्व प्रात्यक्षिके अनुभवी ब्युटीशियनच्या पार्लरमध्ये मार्गदर्शनाखाली घेतली जाणार आहेत. प्रत्यक्ष ग्राहकांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना व्यावसायिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

सौ. सुवर्णा तोंडुलकर या स्त्री सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असून, प्रत्येक स्त्रीच्या हाताला काम मिळावे व ती स्वयंरोजगारातून उद्योजक बनावी, हा त्यांचा ध्यास आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मकता निर्माण होत आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि स्वावलंबनाच्या दिशेने उचललेले हे पाऊल भविष्यात अनेक कुटुंबांसाठी परिवर्तनकारी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. प्रशिक्षणात गुणवत्ता आणि प्रात्यक्षिकांवर विशेष भर दिला जात आहे. 

रायगड जिल्ह्यात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर भागांमध्येही अशा प्रशिक्षण बॅचेस सुरू करण्याची मागणी होत आहे. अमृत संस्थेच्या अशा विविध कौशल्यविकास प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा आणि अन्य योजनांची माहिती घेऊन संस्थेशी जोडले जावे, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेश विनायक मराठे आणि उपव्यवस्थापक मंगेश भागुराम ढेबे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

शैलेश विनायक मराठे - 9112228759

रायगड जिल्हा व्यवस्थापक, अमृत

मंगेश भागुराम ढेबे - 8149552143

रायगड जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 16-02-2026 News publication date | Time: 12:41 PM News publication time | Views: 233 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 16-02-2026 News publication date | Time: 12:41 PM News publication time | Views: 233 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement